थंड हवेचे ठिकाण माथेरान

 

थंड हवेचे ठिकाण माथेरान





माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण . सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडीशी वेगळी झालेली ही डोंगररांग समुद्रसपाटीपासून साधारण २६०० फूट उंच आहे . कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगररांग सुरु होते . मलंगगडाला लागून बदलापूरच्या डोंगरातील गुहा लागतात . नंतर नवरानवरीचा डोंगर लागतो . त्यावर असणाऱ्या बारीक - सारीक सुळक्यांमुळे हाडोंगर लगेच ओळखता येतो . त्यापुढे चंदेरीचा प्रचंड सुळका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो . त्यानंतर नाखिंद डोंगर आणि यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरु होतो . संपूर्ण माथा विविध घनदाट झाडी आणि लाल पायवाटा भरलेला आहे . माथेरानला जाण्यासाठी छोटी आगगाडी येते ती नेरळ स्टेशनवरुन सुटते . डोंगराला वळणं घेत धावणारी ही छोटेखानी आगगाडी माथेरानच्या सहलीतलं विशेष आकर्षण आहे . इसवी सन १८५० मध्ये मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन आणि ठाण्याचा कलेक्टर यांनी हे हिल स्टेशन शोधून काढलं . १८५४ मध्ये मुंबईच्या गव्हर्नरने येथे बंगला बांधला . पुढे माथेरानला पर्यटन स्थळ म्हणून इंग्रजांनी वसवलं . त्यांनी इथल्या विविध स्थळांना नावं दिली त्यामुळे सहाजिकच ती पॉईंटची नावं इंग्रजीत आहेत . पॅनोरमा , गार्बट , अलेक्झांडर , हार्ट लिटल चौक , ग्रेट चौक , वन ट्री हिल , सनसेट पॉइंट , एको पॉइंट हे इथले नयनरम्य पॉईंट्स आहेत . उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि पावसाळ्यानंतर इथली मजा लुटायलापर्यटक गर्दी करतात . माथेरानच्या जंगलात क्वचित बिबटेदेखील आढळतात असे स्थानिक लोक सांगतात . इथल्या पक्षीसृष्टीत मोठ्या प्रमाणावर बुलबुल , दयाळ , लार्क , तांबट , किंगफिशर , धनेश , इत्यादी पक्षी पाहायला मिळतात . माथेरानला पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य तलाव म्हणजे शार्लेट लेक , पावसाळ्यात हा जलाशय पाण्याने पूर्ण भरुन वाहू लागतो त्यावेळी त्याचा धबधबा तयार होतो . त्याचा आवाज उरात धडकी भरवणारा असतो . माथेरानला राहण्यासाठी एमटीडीसीची रेस्ट हाऊसेस आहेत . मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्टेशनवरुन माथेरानला जाणारी ही मिनी ट्रेन झुक झुक करत २१ किलोमीटरचं अंतर दोन तासात पार करते . या गाडीतून माथेरानचं सौंदर्य पाहण्याची मजा काही वेगळीच असते . लांबचे पॉईंट बघण्यासाठी लाब घोड्यावरुनही जाता येते .


टिप्पणियाँ